छत्रपती संभाजीनगर: समस्त देशवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अनपेक्षितपणे वर्ल्ड कप हातून गेला. देशवासियांबरोबर शहरासियांचा हिरमोड झाला. दुपारपासून टीव्हीसमोर तळ ठोकून बसलेल्या शहरातील आबाल-वृद्धांमधून नाराजीचा सूर उमटला. अंतिम सामन्यामुळे सर्वच शहरवासीयांचे डोळे खेळाकडे लागलेले होते. त्यामुळेच सामना सुरू होण्यापूर्वी बहुतेकांनी आपली सर्वच दैनंदिन कामे उरकुन घेतली होती. त्यातच रविवार हा सुटीचा दिवस असल्याने योगायोगाने अखंड खेळ बघण्यात कोणताही अडथळा नव्हता. साहजिकच दुपारी सामना सुरू होण्यापूर्वी सर्वच घरातील टीव्ही लागलेले होते आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खेळ सुरू होण्यापूर्वीच फटाक्यांसह जल्लोशाची सगळी इत्यंभूत तयारी करण्यात आली होती. भारतीय संघ सलग दहा खेळ जिंकल्याने अंतिम सामनादेखील जिंकणार, अशीच खुणगाठ प्रत्येकाच्या मनात होती. त्याचाच परिणाम म्हणून विजयोत्सवाची सर्वांनीच आपापल्या परीने तयारी केली होती. मात्र जशीजशी ऑस्ट्रेलियाची बॅटिंग रंगात येऊ लागली तशी शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत गेली. आता खेळ हातून जाणार हेही हळूहळू लक्षात येत गेले. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा विजयी शॉट आकाशात झेपावला आणि बघता-बघता वर्ल्ड कप हातून गेला. समस्त शहरावासियांचा हिरमोड झाला. वर्ल्ड कप हातून गेल्यानंतर शहरभर शांतता होती आणि नाराजीची शांतता सर्वांनाच बोचत होती. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ होती; परंतु सामना सुरू होताच शहरातील बहुतांश रस्त्यांवरील कमी झालेली वर्दळ स्पष्टपणे जाणवत होती. साहजिकच मुख्य रस्ते बऱ्यापैकी मोकळे दिसून येत होते.
https://ift.tt/ZQCGn5M