
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वतीने हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरून स्वच्छ केले जात असून या वाहनातील स्प्रेयर प्रणालीव्दारे हवेतील धूलिकणांची सफाई केली जात आहे.राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शुद्ध हवेच्या गुणवत्तेची मानके निर्धारित मर्यादेत आणण्यासाठी १५व्या वित्त आयोगांतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने दोन मल्टीपर्पज स्प्रेयर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल घेतली आहेत. याद्वारे हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पाण्याने रस्त्यांची साफसफाई व हवेत उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांद्वारे धूलिकणांना प्रतिबंध केला जात आहे. यामध्ये वापरले जाणारे पाणी हे सी-टेक मलप्रक्रिया केंद्रातून शुद्धीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी आहे. त्यामुळे पाण्याने रस्त्यांची स्वच्छता करण्याचा उद्देश साध्य होत आहे, शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे.या वाहनाद्वारे महापालिकेच्या परिमंडळ १ विभागात वाशी रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेथून डावीकडे सागर विहारपर्यंत व कोपरखैरणे-घणसोली नोड जंक्शनपर्यंत, त्यानंतर एपीएमसी मार्केट परिसरात साफसफाई, त्यानंतर तुर्भे-वाशी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येऊन डावीकडे वळत, वाशी रेल्वे स्थानकापर्यंत रस्ते सफाई व धूलिकण स्वच्छता करण्यात आली. तर परिमंडळ २ विभागात ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे उड्डाणपूलापासून टी जंक्शन ऐरोलीपर्यंत, ऐरोली-मुलुंड खाडीपूलाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून दिवा कोळीवाडा चौक मार्गे टी जंक्शनपर्यंत, तेथून दिघागाव रेल्वे स्थानकापर्यंत, ठाणे-बेलापूर रोडने तुर्भे उड्डाणपूलापर्यंत अशा प्रकारे रस्ते स्वच्छता करण्यात आली.नवी मुंबई महापालिका हवेच्या गुणवत्ता निर्दशांकात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करत असून नवी मुंबईकर नागरिकांनीही वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेस संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.साफसफाई सुरूच राहणारयापुढील काळातही शहरातील वाहनांची वर्दळ असलेल्या विविध रस्त्यांची स्वच्छता अशीच सुरू राहणार आहे. प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून स्वच्छ केले जाणार आहेत, तसेच या पाण्याचे फवारे हवेत फवारून हवेतील धूलिकणांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.Read And