
जगात अशी अनेक ठिकाणे आहे जी आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. इंडोनेशियातील जावा बेटावर बादुई जमातीचे एक अनोखे गाव आहे. हे गाव नकाशावर दिसते, मात्र ते बाहेरील जगापासून खूप दूर आहे. या गावात मोबाईल फोन, रेडिओ किंवा वीज यासारख्या गोष्टी नाहीत. या ठिकाणी राहणाऱ्या बादुई लोकांना पृथ्वीवरील पहिले मानव म्हटले जाते. हे लोक संकट टाळण्यासाठी कठोर नियमांचे पालन करतात. पण या जमातीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती आहेत. ते एखाद्याच्या मनात काय सुरु आहे हे वाचू शकतात, तसेच एखाद्याचे भविष्य सांगू शकतात.
ट्रॅव्हल व्लॉगर इसा खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बादुई लोकांच्या जीवनाचा आणि या शक्तींचा इतिहास सांगतो. यातील माहिती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे लोक देवाशी थेट संवाद साधू शकतात असंही मानलं जातं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बाहेरील लोकांना प्रवेश नाही
बादुई ही जमात बांटेन प्रांतातील कंधारसी गावाजवळ राहते. हा एक 12 हजार लोकांचा समूह आहे, जो सुंदा भाषा बोलतो. हे लोक स्वतःला जगातील पहिले लोक मानतात, त्यामुळे ते निसर्गाशी सुसंगत राहणे पसंत करतात. या व्हिडिओमध्ये ईसा खान यांनी सांगितले की, बादुई लोक मातीची धूप रोखण्यासाठी धातूच्या नांगरांचा वापर टाळतात. येथे शिक्षण, काच, दारू, चप्पल, पाण्याचा प्रवाह बदलणे आणि चार पायांचे प्राणी पाळणे या गोष्टींना मनाई आहे. तसेच खून, चोरी, खोटे बोलणे, नशा करणे, रात्री जेवण करणे, गाडी चालवणे, फुले किंवा अत्तर लावने घालणे, सोने किंवा चांदी स्वीकारणे, पैशांना हात लावणे किंवा केस कापणे यावर मनाई आहे. जे लोक हे नियम पाळत नाहीत ते मुख्य गावाबाहेर राहतात कारण त्यांना गावातून बाहेर हाकलून दिलेले असते.
View this post on Instagram
बदल होण्यास सुरुवात
बादुई समुदाय दोन भागात विभागलेला आहे. एक बाह्य बदुई जिथे आधुनिकीकरणाचा शिरकाव झालेला आहे आणि दुसरे म्हणजे अंतर्गत बादुई जिथे परंपरा पाळल्या जातात. बाहेरील लोकांना अंतर्गत बादुईमध्ये प्रवेश करता येत नाही. आतमधील गावात जवळपास प्रत्येकाकडे मन वाचण्याची आणि भविष्य पाहण्याची कला आहे असं मानलं जातं. “पु’उन” नावाच्या धार्मिक नेत्यांकडे अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते. ते मन वाचू शकतात, भविष्यही सांगू शकतात, तसेच एखाद्याचे नशीब बदलू शकतात. बाहेरील लोकांना ते करत असलेले विधी पाहण्याची परवानगी नाही.
या विधींद्वारे ते निसर्गाची पूजा करतात आणि त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. बादुई लोकांच्या श्रद्धा सांगा सारी (सुंडा हिंदू) परंपरेतून निर्माण झाल्या आहेत, जिथे निसर्गाला देवत्व दिले जाते. हे लोक पांढरे कपडे घालतात, लांब केस ठेवतात. हे लोक लाकडी अवजारांनी शेती करतात. शेतीतून ते तांदूळ आणि मका ही पिके घेतात. त्यासोबतच जंगलातून फळे आणि भाज्या गोळा करणे हे त्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे.