
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महापालिकेने गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या कारवाईत तब्बल ९० टक्के पाट्या या मराठीत आढळून आल्या आहेत. मागील आठवडाभरात २० हजारांहून अधिक दुकानांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये १,१०० दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत पाट्या नसल्याने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. पालिकेने २८ नोव्हेंबरपासून न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे.मागील आठ दिवसांत २०,९२३ दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीत १९,८२७ पाट्या आढळून आल्या असून १,०९६ दुकाने व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ दिवसांच्या कारवाईवरून मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात किंवा पालिका दुकानांपर्यंत पोहोचण्यात कमी पडत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.