माजी अधिकारी फोन टॅपिंगमध्ये? १ लाख कॉल्स टॅप केलेले, तेलंगणमध्ये ३० जण चौकशीच्या फेऱ्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 26, 2024

माजी अधिकारी फोन टॅपिंगमध्ये? १ लाख कॉल्स टॅप केलेले, तेलंगणमध्ये ३० जण चौकशीच्या फेऱ्यात

https://ift.tt/UD6hzAQ
वृत्तसंस्था, हैदराबाद : तेलंगणच्या गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख टी. प्रभाकर राव यांना फोन टॅपिंगप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. राव यांच्या आदेशाने राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करून इलेक्ट्रॉनिक डेटा बेकायदा पद्धतीने संकलित करण्यात आल्याचा आरोप आहे.माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळातील हे प्रकरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे एक लाख फोन कॉल टॅप करण्यात आले. त्यात एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख असलेले टी. प्रभाकर राव सध्या अमेरिकेत असल्याची चर्चा असून, त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. हैदराबादमधील त्यांच्या घरासह इतर ठिकाणी तपास यंत्रणांनी छापे घातले. ‘आय न्यूज’ हे तेलुगू चॅनेल चालवणाऱ्या श्रावण राव यांच्या घरीही झडती घेण्यात आली. श्रावण राव हेदेखील देशाबाहेर असल्याची चर्चा असून, त्यांनी कथितरीत्या फोन टॅपिंगची उपकरणे आणि सर्व्हर बसवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे. स्थानिक शाळेच्या आवारात हा सर्व्हर बसवण्यात आला होता.राधाकृष्ण राव या पोलिस अधिकाऱ्याचे नावही आरोपींमध्ये असून, त्यांच्याविरोधातही लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात तेलंगण पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक भुजंग राव, तिरुपतन्ना आणि उप अधीक्षक प्रणीत राव यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. भुजंग राव आणि तिरुपतन्ना यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. खासगी व्यक्तींवर बेकायदा पाळत ठेवल्याची आणि पुरावे नष्ट केल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे. प्रणीत राव यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. काही कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर साठवलेला डेटा नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भारत राष्ट्र समितीचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभाकर राव यांनी दिलेल्या आदेशावरून, इतर अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. राजकीय नेत्यांवर पाळततेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, भाजप आणि काँग्रेसचे नेते, भारत राष्ट्र समितीचे नेते यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. काही तेलुगू अभिनेते आणि उद्योगपतींवरही पाळत ठेवण्यात आली होती आणि त्यापैकी अनेकांना ब्लॅकमेल करण्यात आले होते.राव यांच्या पुतण्यावर गुन्हाहैदराबाद : तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पुतण्या आणि राज्यसभा खासदार जे. संतोष राव आणि लिंगारेड्डी श्रीधर या दोघांविरोधात ४० कोटींचा भूखंड बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेडने गुरुवारी तक्रार दाखल केली. बंजारा हिल्समधील रोड नंबर १४वरील कंपनीचा भूखंड बळकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.