पक्षाकडून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस, २४ तासांत लेखी उत्तर देण्याचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 27, 2024

पक्षाकडून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस, २४ तासांत लेखी उत्तर देण्याचे आदेश

https://ift.tt/V3PKteH
पुणे: महायुती असूनही युतीचा धर्म न पाळता बंडाचा झेंडा फडकविण्याचे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी केलेले हे धाडस त्यांना महागात पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली. त्यामुळे शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेऊन सांगतो, असे शिवतारे म्हणाले होते. निर्णय घेण्याऐवजी ते बारामती मतदारसंघातील विविध तालुक्यात जाऊन दौरे करीत आहेत. कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करीत आहेत. बारामती, इंदापूर, भोर या तालुक्यांमध्ये त्यांनी दौरे करताना अजित पवार यांच्यावर पुन्हा तोफ डागली. ‘अजित पवार हे महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहे,’ असे विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला. शिवतारे यांच्याकडून वाद वाढविला जात असल्याचे बोलले जात आहे. शिवतारे यांच्या दौऱ्यासह त्यांच्या वक्तव्याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली. शिवसेनेच्या पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाच्यावतीने विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना येत्या २४ तासात लेखी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. दरम्यान, अर्ज भरेपर्यंत आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. अन्यथा त्यांचा आमचा संबंध संपला, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.