बुलढाणा: नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाळापुर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंत शैल्य चिकित्सक डॉ. निलेश रामराव माळोदे (२७) याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता. या वधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश रामराव माळोदे आणि सौ. संगीता रामराव माळोदे हे तिघे इंदोर येथे कार्यक्रम आटपून आज ३१ मार्चच्या संध्याकाळी परत बाळापूर येथे येत होते. यावेळी गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अकोला कडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कार्याला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. या अपघातात डॉ. निलेश माळोदे आणि त्याची आई सौ संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह पार पडणार होता. त्यांच्या विवाहाची जवळपास सर्व तयारी झालेली होती. नातलगांना निमंत्रण सुद्धा पाठविण्यात आले होते. परंतु लग्नाआधीच त्यांच्यावर काळाने अचानक घातल्याने माळोदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
https://ift.tt/jnBzfS3