पोलीस आयुक्तांनी भाजप शहराध्यक्षासारखं वागू नये, बच्चू कडू संतापले, वाचा नेमकं काय घडलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 23, 2024

पोलीस आयुक्तांनी भाजप शहराध्यक्षासारखं वागू नये, बच्चू कडू संतापले, वाचा नेमकं काय घडलं?

https://ift.tt/3Gh28vI
अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना राजकारण तापू लागलं आहे. २३ आणि २४ तारखेसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आरक्षित करण्यात आलेले सायन्स कोर मैदान वेळेवर दुसऱ्या पक्षाला दिल्याने संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष सारखी भूमिका बजावणं थांबवावं, अशी टीका यावेळी त्यांनी केली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकसभा उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी २३ आणि २४ एप्रिल रोजी अमरावती शहरातील मुख्य भागावर असलेले सायन्स कोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. त्याकरिता रीतसर पैसे सुद्धा भरण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्यात मैदानावर एका मोठ्या राजकीय नेत्याची सभा होणार असल्याने आमच्यावर दबाव निर्माण केला जात असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की, आम्ही सभेसाठी २२ आणि २३ एप्रिलसाठी मैदान आरक्षित केलं होतं. त्यासाठी पैसे सुद्धा भरले होते. मात्र आता त्या ठिकाणी एका मोठ्या सभेची तयारी सुरू असून आम्ही त्याचे कार्यक्रम घेऊ नये, यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. जिल्हा प्रशासनाचे लोक आमच्या कार्यकर्त्यांना फोन लावून त्यासंबंधी दबाव निर्माण करत आहे. आमचा पक्ष लहान जरी असता तरी दोन आमदार आणि आता खासदारकीचा एक उमेदवार आमचा असणार आहे. त्यामुळे पुढील काळात आमचे २५ आमदार असतील. आम्ही जे म्हणू ते होईल. पोलीस कार्यकर्त्यांना फोन करून दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष प्रमाणे वागू नये, अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.