कुलर सुरू करायला गेली, १२ वर्षीय चिमुकली शॉक लागून जमिनीवर कोसळली; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 14, 2024

कुलर सुरू करायला गेली, १२ वर्षीय चिमुकली शॉक लागून जमिनीवर कोसळली; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश

https://ift.tt/i4wU2ka
निलेश पाटील, जळगाव : जळगाव तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागला. कुलरमधून लागलेल्या विजेच्या धक्क्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जळगाव तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. अक्षदा किशोर मोरे (वय-१२) असं मृत्यू झालेल्या बालिकेचं नाव आहे.या संदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या महितीनुसार, जळगाव तालुक्यातील किनोद गावात बारा वर्षीय अक्षदा ही आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यान शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचं बटन दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी शेतात गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. नागदुली येथे राहणाऱ्या तरुणाच्या अंगावर शेतात असताना वीज कोसळली यात त्याचं दुर्दैवी निधन झालं. एकुलत्या एका लेकाच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली.