आयुष्यभर एका धर्माचा द्वेष, तेच आज धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करतात, सुनील तटकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 14, 2024

आयुष्यभर एका धर्माचा द्वेष, तेच आज धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करतात, सुनील तटकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

https://ift.tt/opS0hdR
रत्नागिरी : भाजपाने कधीही धर्मनिरपेक्ष विचार बाजूला करा असे आम्हाला महायुतीत घेताना म्हटलेले नाही, परंतु जे आयुष्यभर एका धर्माचा द्वेष करत आले तेच आज निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचे लांगूलचालन करत आहेत. मात्र यांच्यापासून सावध व्हा असे आवाहन आज खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथील अल्पसंख्याक मेळाव्यात केले. आज मंडणगड येथे प्रचाराच्या निमित्ताने अल्पसंख्याक मेळावा पार पडला. त्यानंतर दापोली येथे दुसरा अल्पसंख्याक मेळावा पार पडला. यावेळी रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी यांना सुनावले. आखाती देशात जाणारा माझ्या मुस्लिम तरुणाने इथेच नोकरीधंदा करावा, त्यानेच इथेच रहावे यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणि उद्योगधंदे आणण्याचे काम करणार आहे. कुणबी समाजाचे नाव घेऊन अनेक निवडणूका अनंत गीते यांनी लढवल्या. मात्र ४० वर्षांपासून कुणबी समाजोन्नती संघाचा रखडलेला भूखंड आणि इमारतीचे काम त्यांना करता आले नाही. मात्र हे काम आदरणीय अजितदादा पवार यांनी तात्काळ पूर्ण केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे रायगडचे उमेदवार माजी खासदार आनंद गीते यांनाही टीकेचे लक्ष केलं. त्यांच्याकडे विकासाचे बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत त्यामुळे ते बेछूट आरोप करत आहेत. सहा वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री झालेल्या अनंत गीते यांनी केलेले विकासकाम दाखवा आणि १००० रुपये मिळवा असा आता खेड्यापाड्यातील जनताच बोलू लागले आहे, असे चॅलेंज सुनील तटकरे यांनी गीते यांना दिलं आहे. सर्वांचा विश्वास जिंकत या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावरती तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका साधना बोत्रे, दापोली अर्बन बँकेच्या माजी संचालिका रमा बेलोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.