
कोल्हापूर: पेन म्हणजेच लेखणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित असणारी छोटीशी वस्तू. आपण जन्मल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत सदैव छोटीशी वस्तू आपल्या सोबत असते. प्रत्येक व्यक्तीच्या खिशात असलेला पेन अनेकांच्या व्यक्तिमत्व देखील सांगून जातं. अगदी एक दोन रुपयांपासून सुरू झालेला पेनाचा प्रवास हा आता लाखो रुपयात तसेच विविध रूपात पोहोचला आहे. हाच पेनाचा प्रवास पाहण्याची संधी पहिल्यांदाच कोल्हापुरकरांना मिळत आहे. जगभरातील ५० हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचे प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलं आहे. या प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून ते ७ लाख रुपयांपर्यंतच्या विविध आकाराचे पेन आणि दुर्मिळ शाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.सुरुवातीच्या काळात पक्षांच्या पिसाऱ्यांपासून या पेनांचा सुरू झालेला प्रवास हा आज शाई पेन, बॉल पेन, जेल पेन ते अगदी डिजिटल पेन पर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असले तरी शाई पेन प्रती पेन चाहात्यांचं असलेलं आकर्षण हे अद्याप कमी झालेलं नाही. अनेक मोठ्या प्रसंगी किंवा सुंदर हस्ताक्षरासाठी शाई पेनचा वापर अनेक जण करतात. यामुळे पेन चाहत्यांना विविध पेन आणि या पेनांचा प्रवास माहित व्हावा यासाठी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे बॉब अँड ची या संस्थेच्या वतीने हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील ५० हून अधिक नामांकित ब्रँडच्या तब्बल २००० हून अधिक फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स आणि उच्च दर्जाची दुर्मिळ शाई चा समावेश असून यासोबतच पेन ठेवण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे खास पाऊस आणि केसेस ही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पटना बिहार येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर यांनी संग्रहित केलेले तब्बल १२५ वर्षांपूर्वी पासूनचे पेन हे पेन चाहत्यांचे आकर्षण बिंदू ठरत आहेत.