
अहमदनगर (विजयसिंह होलम) : गावाकडून शहरातील घरी निघालेल्या युवकाचे अपहण करण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी सेवानिवृत्त महसूल अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांकडे पंधरा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. वजिलांनी पोलिस आणि महसूल प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली होती, मात्र युवकाने लघुशंकेचा बहाणा करून आपली सुटका करून घेतली. छत्रपती संभाजीनगर ते नगर महामार्गावर आज भरदिवसा हा थरार झाला. सोनई पोलिस ठाण्यात अपहरणकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. अरोपींनी पाना आणि बंदुकीसारख्या दिसणाऱ्या शस्त्राच्या अधारे युवकाला धमकावले. त्याच्याकडील दागिने, मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड आरोपींनी काढून घेतली आहेत.अहमदनगरला पूर्वी विठ्ठलराव जरे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झालेले आहेत. मूळचे नेवासा तालुक्यातील असून सध्या नगर शहरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय २५ वर्षे, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा हल्ली गुलमोहर रोड, अहमदनगर) याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. अनिरुदध आज सकाळी गावाकडून नगर शहरात येत होता. पांढरीपूल येथे त्याला एक कार दिसली. कारमधील दोन लोकांनी त्याला नगरला सोडतो असे सांगून गाडीत बसायला लावले. गाडी इमामपूर घाटाच्या वर आल्यानंतर आरोपींनी अनिरुदध याला बंदुकीसारखे हत्यार दाखवत धमाकावले. त्याच्याकडील सोन्याची अंगठी, गळ्यातील चैन, मोबाईल फोन व पाकीट बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी जरे याच्या वडिलांना फोन केला. मुलाला सोडण्याच्या बदलल्यात पंधरा लाख रुपयांची मागणी केली. अनिरुदध याला आरोपींनी मारहाणही केली, त्याचा गळा दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.मधल्या काळात आरोपी त्याला गाडीतून फिरवत होते. पाथर्डी तालुक्यातील एका ठिकाणी अनिरुद्ध याने लघुशंकेचा बहाणा करून आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने वडिलांशी संपर्क साधला. तोपर्यंत इकडे वडिलांनी पोलिस आणि महसूल विभागाच्या मदतीने मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याची सुटका झाल्याची माहिती मिळाल्यावर तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.