
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी कणकवली मध्ये सभा घेतली. तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. या सभेत राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझे मित्र माझे जुने सहकारी असा केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले की, कोकण रेल्वे याच कोकणातून गेली. गोव्यात सगळे जण फिरायला जातात. गोव्यात जे बीचवर दिसते ते कोकणात दिसले तर आमची संस्कृती खराब होते असे बोंब उठते. दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही ती संस्कृती काय कामाची? असा सवाल राज यांनी केला. माझ्या प्रचारसभेची नारायण राणेंना गरजच नाहीय ते निवडून आलेले आहेत. केवळ ६ महिने मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी झपाटलेल्या सारखी विकासकामे केली. जर ५ वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले असते तर आज राणेंच्या प्रचाराची गरजच नव्हती. अभ्यासू नेता म्हणून राणेंची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत, त्यातील ७ भारतरत्न ही कोकणातील आहेत. कोकणी जनता ही सुजाण आणि सुज्ञ आहे. मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिली जाहीर सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट नाही पटली तर नाही, पटली तर पटली. आज विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मी पाठिंबा दिला. काश्मीरमधील रद्द केलेले ३७० कलम, अयोध्येत कारसेवकांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, त्यांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली. तेव्हापासून राम मंदिर प्रश्न भिजत पडला होता. आता नरेंद्र मोदींचे सरकार असताना कोर्टाकडून राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. आज नरेंद्र मोदी सरकारमुळे राम मंदिर उभे राहिले. अन्यथा राम मंदिर अशक्य होते. मित्राची खरडपट्टी काढताना आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे असू नये. जे मी २०१९ मध्ये मोदींविरोधात बोललो ते बोलायची आजच्या विरोधकांची हिम्मत नव्हती. मला भूमिका नाही पटली म्हणून मी मोदींच्या विरोधात होतो. नुसताच बाकड्यावर बसणार खासदार हवा की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा खासदार हवा हे ठरवा. मोदींच्या मंत्रिमंडळात राणे मंत्री असतील, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.