
बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 5 दिवस देशातील अनेक भागामंमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान, मेघालय या राज्यांसह महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी आयएमडीकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात दडी मारून बसलेल्या पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढला आहे. शनिवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, आयएमडीकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणात अतिमुळधार पाऊस
पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यानं जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पालघरला पावसाचा येलो अर्लट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रालाही पाऊस झोडपणार
दरम्यान शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 18 आणि 19 ऑगस्ट रोजी विदर्भात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.