
वूमन्स इंडिया ए टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाला या दौऱ्यात काही खास सुरुवात करता आली नाही. यजमान ऑस्ट्रेलिया वूमन्स ए टीमने भारताचा टी 20 मालिकेत धुव्वा उडवला. कांगारुंनी भारताला तिन्ही टी 20 सामन्यांमध्ये पराभूत करत 3-0 क्लीन स्विप केलं. मात्र भारताने त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत कडक सुरुवात केली. भारताने 13 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता भारताकडे सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने फार अटीतटीचा असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यांमध्ये दोन्ही संघात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दुसरा सामना कधी आणि कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा आणि निर्णायक सामना हा शुक्रवारी 15 ऑगस्टला होणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल येथे आयोजित करण्यात आला आहे. ताहलिया मॅकग्राथ ऑस्ट्रेलिया ए वूमन्स संघाचं नेतृत्व करणार आहे. तर राधा यादव हीच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर मिन्नू मणी ही उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पहिल्या सामन्यात काय झालं होतं?
दरम्यान उभयसंघातील पहिला सामना 13 ऑदस्टला इयान हिली ओव्हल येथेच खेळवण्यात आला. भारताच्या कडक बॉलिंगसमोर कांगारुंना पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. त्यामुळे भारताला सोपं आव्हान मिळालं. भारताने कांगारुंना 47.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. भारतासाठी कॅप्टन राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी राधाला चांगली साथ देत कांगारुंना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर भारताने 215 धावांची विजयी आव्हान हे 7 विके्टसच्या मोबदल्यात 42 षटकांमध्ये सहज पूर्ण केलं. भारतासाठी ओपनर यास्तिका भाटीया हीने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर शफाली वर्मा 36, धारा गुज्जर 31 आणि राघवी बिष्ठ हीने नाबाद 25 धावा करत भारताला सहज विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताला दुसऱ्या सामन्यातही अशीच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. भारतीय महिला ब्रिगेड या सामन्यात कशी कामगिरी करतात? हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.