IND vs PAK : पीसीबीच्या घोषणेमुळे भारताचं काम आणखी सोपं, युवाब्रिगेड 14 सप्टेंबरला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सज्ज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 18, 2025

IND vs PAK : पीसीबीच्या घोषणेमुळे भारताचं काम आणखी सोपं, युवाब्रिगेड 14 सप्टेंबरला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सज्ज

IND vs PAK : पीसीबीच्या घोषणेमुळे भारताचं काम आणखी सोपं, युवाब्रिगेड 14 सप्टेंबरला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सज्ज

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 17 ऑगस्टला 17 सदस्यीय संघ जाहीर केला. पाकिस्तान यासह या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारी पहिली टीम ठरली. पीसीबी निवड समितीच्या या घोषणेमुळे भारताला एकाप्रकारे मदतच झालीय. पीसीबीने संघ जाहीर केल्याने भारतासमोर कोणत्या 11 खेळाडूंचं आव्हान असणार? हे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तान विरूद्धच्या हायव्होल्टेज सामन्याच्या सरावासाठी मदत झालीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

5 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार

आशिया कप स्पर्धेत सलमान अली आगाह हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच या स्पर्धेत पाकिस्तानचे 5 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आहेत. यामध्ये सॅम अय्यूब, अबरार अहमद, सुफियान मुकीम, हसन नवाज आणि साहिबजादा फरहान हे 5 खेळाडू पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला निवड समितीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना डच्चू दिला आहे.

टीम इंडिया आशिया कप आणि आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत कायमच पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानला 2025 मध्ये काही खास करता आलेलं नाही. त्यात भारताविरूद्धचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. यंदा टी 20I फॉर्मेटने आशिया कप स्पर्धा होणार असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे संघात नसणार हे निश्चित आहे.

विराट आणि रोहित ही जोडी टी 20I निवृत्तीमुळे आशिया कप स्पर्धेत नसणार हा पाकिस्तानसाठी मोठा दिलासा आहे. मात्र बीसीसीआय निवड समिती भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी देणार? हे अजूनही स्पष्ट नाही. तर तुलनेत पाकिस्तानने संघ लवकर जाहीर केलाय. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पाकिस्तानच्या या खेळाडूंचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून त्यांच्यासाठी खास योजना आखू शकते. भारताला अशाप्रकारे पाकिस्तान संघाची घोषणा झाल्याचा फायदा होऊ शकतो.

पाकिस्तानला ट्राय सीरिजमुळे फायदा होणार?

दरम्यान पाकिस्तान आशिया कपआधी टी 20 ट्राय सीरिज खेळणार आहेत. पाकिस्तानसमोर या मालिकेत यूएई आणि अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. ट्राय सीरिजमधील एकूण 7 सामने हे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. प्रत्येक संघाला इतर 2 संघांविरुद्ध 2-2 सामने खेळायचे आहेत. या मालिकेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघांसाठी ही मालिका फायदेशीर ठरु शकते.