
दक्षिण आफ्रिकेचा युवा आणि विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी 20i मालिका चांगलीच गाजवली. दक्षिण आफ्रिकेला 16 ऑगस्टला तिसर्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिकंली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षीय डेवाल्डने आपल्या झंझावाती खेळीने क्रिकेट चाहत्यांनी मनं जिंकली. तसेच डेवाल्डने आपली छाप सोडली.
डेवाल्डने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतक ठोकलं. डेवाल्डने दुसऱ्या टी 20i सामन्यात नाबाद 125 धावांची खेळी केली होती. तर डेवाल्डने तिसऱ्या सामन्यात 53 धावांची खेळी केली. डेवाल्डने यासह भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याचा 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. इतकंच नाही तर डेवाल्डने पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम यालाही मागे टालसं.
डेवाल्ड ब्रेव्हीसकडून विराटचा रेकॉर्ड ब्रेक
डेवाल्डने या 53 धावांच्या खेळीत 40 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. डेवाल्डने या खेळीत 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. डेवाल्डने या 6 षटकारांसह विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला. डेवाल्ड यासह ऑस्ट्रेलियात टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा विदेशी फलंदाज ठरला. डेवाल्डने याबाबत विराटला मागे टाकलं. विशेष म्हणजे डेवाल्डचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता.
ऑस्ट्रेलियात गेल्या 8 वर्षांपासून टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 13 षटकार खेचण्याचा विक्रम विराटच्या नावावर कायम होता. मात्र आता हा विक्रम डेवाल्डच्या नावावर झाला आहे.
ऑस्ट्रेलियात टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे विदेशी खेळाडू
डेवाल्ड ब्रेव्हीस – 14 षटकार
विराट कोहली – 13 षटकार
शिखर धवन – 9 षटकार
आंद्रे रसेल – 9 षटकार
डेवाल्डने बाबर आझम यालाही पछाडलं
तसेच डेवाल्डने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत बाबर आझम याला मागे टाकलं आहे. मात्र डेवाल्ड विराट कोहली याला पछाडण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 टी 20i सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराटच्या नावावर आहे. तर डेवाल्डने या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बाबरला मागे टाकलं.
डेवाल्डने या मालिकेत एकूण 180 धावा केल्या. तर बाबरने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 163 धावा केल्या होत्या. तर विराटने 2015-2016 साली कांगारुंविरुद्ध 199 धावा कुटल्या होत्या.