Asia Cup 2025 स्पर्धेतून ए ग्रुपमधील संघाचं पॅकअप, पराभूत होताच बाजार उठला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 16, 2025

Asia Cup 2025 स्पर्धेतून ए ग्रुपमधील संघाचं पॅकअप, पराभूत होताच बाजार उठला

Asia Cup 2025 स्पर्धेतून ए ग्रुपमधील संघाचं पॅकअप, पराभूत होताच बाजार उठला

आशिया कप 2025 स्पर्धेत गतविजेत्या टीम इंडियाने रविवारी 14 सप्टेंबरला सहाव्या सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा साखळी फेरीतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. भारताने पाकिस्तानवर मात करत दुबईतील 2-2 विजयाची बरोबरी केली. तसेच भारताने सुपर 4 मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. तर दुसर्‍या बाजूला काही तासांनी ए ग्रुपमधील एका संघाचं या स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, ओमान, यूएई आणि पाकिस्तान असे 4 संघ आहेत.

ओमानचा बाजार उठला

संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईने सोमवारी 15 सप्टेंबरला स्पर्धेतील सातव्या सामन्यात ओमानवर 42 धावांनी विजय मिळवला. दोन्ही संघाची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा होता. यूएईने या सामन्यात बाजी मारली. यूएईने 173 धावांचं पाठलाग करणाऱ्या ओमानला 130 वर रोखलं. ओमानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. ओमान टीम 18.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. या पराभवासह ओमान या स्पर्धेतून बाहेर होणारी दुसरी तर ए ग्रुपमधील पहिली टीम ठरली. हाँगकाँग या स्पर्धेतून बाहेर होणारी पहिली टीम ठरली.

ओमानने या मोहिमेतील आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. पाकिस्तानने 12 सप्टेंबरला झालेल्या या सामन्यात ओमानवर 93 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ओमानसाठी यूएई विरुद्धचा सामना आर या पार असा होता. मात्र यूएईने या सामन्यात चमकदार कामगिरी करत ओमानला पराभूत केलं आणि आपलं आव्हान कायम ठेवलं.

ओमनचा तिसरा आणि अंतिम सामना केव्हा?

सलग 2 सामने गमावल्याने ओमानचा या स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र ते शक्य नाही. कारण ओमानसमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. भारताने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकले आहेत. भारत विरुद्ध ओमान यांच्यात 19 सप्टेंबरला हा सामना होणार आहे.

ओमानची पहिलीच वेळ

दरम्यान ओमानची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय. याआधी आशिया कप स्पर्धेत थेट 5 संघ पात्र ठरायचे. तर 1 संघ एसीसी क्वालिफायरमधून निश्चित व्हायचा. अशाप्रकारे स्पर्धेत एकूण 6 संघ खेळायचे. मात्र एसीसीसी क्वालिफायरमधील उपविजेता आणि तिसर्‍या स्थानी असलेल्या संघालाही आशिया कप स्पर्धेत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यूएई आणि ओमानला संधी मिळाली. मात्र ओमानला पहिल्या 2 सामन्यात तरी विजयी होता आलं नाही. त्यामुळे ओमान आपल्या तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.