
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत सलग 6 विजय मिळवले आहेत. भारताने साखळीनंतर सुपर 4 फेरीत विजयी झंझावात कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धुळ चारली. भारताने यूएई, ओमान, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघांना 1 वेळा पराभूत केलं. तर भारताने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीत एकूण 2 वेळा पराभूत केलं. आता टीम इंडिया आशिया कप ट्रॉफी जिंकण्यासाठी या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्यांदा 2 हात करणार आहे.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 41 वर्षांत भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. या महामुकाबल्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघांची टी 20I क्रिकेटमध्ये दुबईत कामगिरी कशी राहिली आहे हे जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यानिमित्ताने दुबईत सहाव्यांदा आमनेसामने असणार आहेत. या आधी दोन्ही संघात 5 टी 20I सामने झाले आहेत. भारताने या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया या टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेआधी पाकिस्तान विरुद्ध टी 20 सामने जिंकण्याबात 2-1 ने पिछाडीवर होती. मात्र टीम इंडियाने साखळी आणि सुपर 4 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत 3-2 ने आघाडी घेतली.
उभयसंघातील पहिला सामना 4 वर्षांआधी
उभयसंघात या मैदानात जवळपास 4 वर्षांआधी पहिला सामना झाला होता.पाकिस्तानने 24 ऑक्टोबर 2021 रोजी टीम इंडियावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. पाकिस्तानने 152 धावांचं आव्हान एकही विकने न गमावता पूर्ण केलं होतं.
त्यानंतर टीम इंडियाने 28 ऑगस्ट 2022 रोजी दुबईत पाकिस्तान विरुद्ध झालेला टी 20I सामना हा 5 विकेट्सने जिंकून पहिल्या पराभवाची परतफेड केली होती.
त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी पुन्हा दोन्ही संघ आमनेसाने आले. पाकिस्तानने 4 सप्टेंबर 2022 रोजी भारताला 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. पाकिस्तानने यासह 2-1 ने आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले.
भारताने 14 सप्टेंबरला साखळी फेरीत 7 विकेट्सने पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाने सुपर 4 फेरीत पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने यासह दुबईत 5 सामन्यांनंतर 3-2 ने आघाडी घेतली. आता टीम इंडिया रविवारी दुबईत 28 सप्टेंबरला विजयी चौकार लगावत सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.