
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. खासकरून अमेरिका या दौऱ्यावर बारीक नजर ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत, चीन आणि रशिया यांच्यातील संबंधांवर खूप गोष्टी अवलंबून आहेत. अशातच आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकाकार जॉन बोल्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावर आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेतील सहभागावर भाष्य केलं आहे. बोल्टन यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा दौरा हा पाश्चात्य देशांसाठी वाईट बातमी आहे. कारण त्यांनी शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील उपस्थित आहेत. मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या बैठकीमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ही बैठक अमेरिकेला खटकली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन म्हणाले की, ‘ही खूप वाईट बातमी आहे. गेल्या काही दशकांपासून पश्चिमेकडील देशांनी सोव्हिएत युनियन आणि रशियाच्या शीतयुद्धाच्या छायेतून भारताला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भारत, चीन आणि रशियापासून दूर रहावा यासाठी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह क्वाडसारखे सुरक्षा व्यासपीठ तयार करण्यात आले होते, मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे.’ बोल्टन यांच्या विधानाचा अर्थ म्हणजे मोदींनी शी जिनपिंग आणि पुतीन यांची भेट घेतली हे पाश्चात्य देशांना खटकलं आहे.
ट्रम्प सरकारवर टीका
जॉन बोल्टन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्रम्प सरकारने अमेरिकेच्या दशकांच्या प्रयत्नांना फाटा दिला, कारण ट्रम्पने भारतावर लादलेले शुल्क ही एक मोठी चूक होती. यामुळे अमेरिका-भारतातील संबंध बिघडले. त्यामुळे आता भारत पुन्हा रशियाच्या जवळ जाताना दिसत आहे, तसेच चीनसोबतचे नातेही सुधारताना दिसत आहे. आता अमेरिकेला भारतासोबत मैत्री करण्यास आणखी काही वर्षे लागू शकतात.
बोल्टन आणि ट्रम्प यांच्यात संघर्ष
जॉन बोल्टन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात बोल्टन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. मात्र कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. बोल्टन यांनी आपल्या “द रूम व्हेअर इट हॅपन्ड” या पुस्तकात ट्रम्प यांना अयोग्य राष्ट्रपती असे म्हटले आहे.