
Ukraine Russia War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि यक्रेन यांच्यातील थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांत समेट घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्याशी चर्चे केली आहे. सोबतच त्यांनी युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा करून शस्त्रसंधी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप ट्रम्प यांना यात यश आलेले नाही. असे असतानाच आता रशियाने युक्रेनवर शेकडो ड्रोन डागले आहेत. रशियाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आता युक्रेननेदेखील रशियावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियातील चार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे आता रशिया आणि युक्रेन यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
युक्रेनचे 149 ड्रोन हाणून पाडले
मिळालेल्या माहितीनुसार रशियाने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आता युक्रेननेही रशियावर थेट ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियातील चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला रशियातील समारा भागात करण्यात आला आहे. हा हल्ला होताच तेथील प्रादेशिक गव्हर्नर याचेस्लाव्ह फेडोरिश्चेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने रसियावर रात्री ड्रोन हल्ला केला आहे. रशियन लष्करानेदेखील या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आमच्या लष्कराच्या यंत्रणेने युक्रेनचे एकूण 149 ड्रोन हाणून पाडले. यातील 15 ड्रोन हे समारा प्रदेशातील होते.
युक्रेनचे एकूण 3 नागरिक मृत्युमुखी
युक्रेनच्या या हल्ल्यानंतर आता रशिया पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. या हल्ल्याआधी झेलेन्स्की यांनी रशियाने केलेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे एकूण 3 नागरिक मृत्युमुखी पडले होते. तर एकूण 30 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. युक्रेनच्या लष्कारच्या दाव्यानुसार रशियाने युक्रेनवर तब्बल 619 ड्रोन हल्ले केले होते. यातील काही ड्रोन युक्रेनने हाणून पाडले. तर काही ड्रोनचा स्फोट झाला. यातच तीन नागरिकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आता रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता रशियादेखील युक्रेनवर हल्ला करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्ध भडकणार का? अशीही चिंता संपूर्ण जगाला लागली आहे.