नोबेल पुरस्कार हुकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले, मीच खरा… - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 11, 2025

नोबेल पुरस्कार हुकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले, मीच खरा…

नोबेल पुरस्कार हुकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले, मीच खरा…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही महिन्यांपासून नोबेल पुरस्कारावर दावा करताना दिसले. मी जगातील मोठी 8 युद्धे रोखली असल्याने मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, असे ते जाहीरपणे बोलताना दिसले. हेच नाही तर नोबेल पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास अगोदर हमास-इस्त्रायल युद्धाबाबत त्यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा झाली असून इतके प्रयत्न करूनही डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळाला नाही. व्हाईट हाऊसने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच यावर टीका केली. आता नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आलीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मला आज फोन केला आणि म्हटले की, तुमच्या सन्मानार्थ मी हा पुरस्कार स्वीकारत आहे, कारण तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र होता. पण मी त्यांना अजिबात म्हटलो नाही की, मला तो पुरस्कार द्या. मला वाटतं त्यांनी केलं. मी त्यांना शक्य तितकी मदत करत आहे. मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, मी आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले.

व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. 1.2 दशलक्ष डॉलर्स त्यांना या पुरस्कारासोबतच दिली जातील. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. नोबेल पुरस्कार न मिळाल्याने ते निराश झाल्याचे स्पष्ट दिसतंय.

गाझा पट्टीतील शांततेवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला वाटते की गाझाची पुनर्बांधणी होईल. तिथे काही खूप श्रीमंत देश आहेत. त्यासाठी त्यांच्या संपत्तीचा एक छोटासा भाग लागेल. इस्त्रायलसोबतच्या युद्धामुळे गाझापट्टीचे मोठे नुकसान झाले. फक्त नुकसानच नाही तर तेथील शेती पुढील 25 वर्ष पिकू शकणार नाही, इतका वाईट परिणाम या युद्धाचा झालाय.