
Today Weather News : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार कोसळत थैमान घालणाऱ्या पावसाने आता काही काळ विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू झाली असून लवकरच देशभरातून मान्सूर परतेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांच्या विरामानंतर मान्सूनची परतीची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे लवकरच ऑक्टोबर हिट जाणवू लागेल. तथापि, हवामान खात्याने ईशान्य मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्याला रिट्रीटिंग मान्सून (Retreating Monsoon) असेही म्हणतात. एवढंच नव्हे तर बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. पश्चिमी विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे ही प्रणाली पुन्हा सक्रिय होत आहे.
हवामान विभागाच्या सांगण्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या प्रणालीमुळे ईशान्य मान्सूनला (Northeast Monsoon) सुरुवात होणार आहे. ही प्रणाली खूपच तीव्र मानली जाते, ज्यामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे निर्माण होतात.या मान्सूनने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कहर माजू शकतो. तो दोन ते तीन दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे हवामान खात्याने नमूद केलं.
दक्षिणेत कोसळणार पाऊस
हवामान खात्याने तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. ईशान्य मान्सूनमुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
येत्या 24 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा तसेच नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.
बंगालच्या खाडीत चक्रीवादळ
तसेच बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासांत तो तीव्र होऊ शकतो, ज्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडू आणि दक्षिण किनारी आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पश्चिमी विक्षोभ आणि आर्द्रतेमुळे पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे. किनारी भागात 100-150 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.