वादानंतर मृण्मयी देशपांडेनं बदललं ‘मनाचे श्लोक’चं नाव; काय आहे नवीन नाव? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 15, 2025

वादानंतर मृण्मयी देशपांडेनं बदललं ‘मनाचे श्लोक’चं नाव; काय आहे नवीन नाव?

वादानंतर मृण्मयी देशपांडेनं बदललं ‘मनाचे श्लोक’चं नाव; काय आहे नवीन नाव?

मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटावरून मोठा वाद झाला. चित्रपटाच्या या नावामुळे भावना दुखावल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली. त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर इथल्या थिएटरमधील या चित्रपटाचे शोज थांबवण्यात आले. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर मृण्मयीने मोठा निर्णय घेतला. या चित्रपटाचं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रदर्शन थांबवत तिने नाव बदलण्याचं ठरवलं. नुकतीच तिने चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा केली आहे. हे नवीन नाव ‘तू बोल ना’ असं आहे. ‘तू बोल ना’ हा चित्रपट आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये, यासाठी नव्या नावासह, नव्या जोमानं चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबदल चित्रपटाचे निर्माते म्हणाले, ”गेले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता, परंतु रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमं आणि हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीचा अभूतपूर्व पाठिंबा आम्हाला खूप बळ देऊन गेला. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा नव्या नावानं, नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत. रसिकांना आता हा चित्रपट सुविहित पाहाता येईल.”

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसंच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

चित्रपटाच्या नावावरून वाद का?

मृण्मयीने जरी तिच्या चित्रपटाचं नाव ‘मनाचे श्लोक’ असं दिलं असलं तरी याच नावाने समर्थ रामदारांनी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नये, असा मुद्दा मांडला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा वादग्रस्त मुद्दा मांडण्यात आल्याचंही म्हटलं गेलंय. त्यामुळे अशा विषयाच्या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात आहे. आज ‘मनाचे श्लोक’ असं नाव देऊन त्यात लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलची कथा दाखवली, उद्या ‘ज्ञानेश्वरी’ असं चित्रपटाचं नाव देत त्यात गौतमी पाटीलला नाचवतील, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.