
क्रिकेटकडे एक संधी मागणाऱ्या करुण नायर याला इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समितीने संधी दिली. मात्र करुण नायर याला या संधीचं सोनं करुन संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी दावा ठोकता आला नाही. करुणला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. करुणने या दौऱ्यात फक्त 1 अर्धशतक केलं. त्यामुळे करुणचा वेस्ट इंडिज विरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पत्ता कट होणार हे निश्चित होतं. अखेर तसंच झालं. करुणला या मालिकेतून वगळण्यात आलं. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. भारताने अडीच दिवसांतच सामना जिंकला. त्यानंतर आता 6 ऑक्टोबरला करुण नायरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
करुणचा देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जुन्या संघात समावेश करण्यात आला आहे. करुण 2 वर्षांनंतर कर्नाटकसाठी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एलीट ग्रुपमधील सामन्यांना 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. कर्नाटक या स्पर्धेतील आपला सलामीचा सामना हा सौराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. करुणला या सामन्यासाठी कर्नाटक संघात स्थान देण्यात आलं आहे.
करुण या आधी कर्नाटकाची साथ सोडून विदर्भाकडून खेळला. करुणने विदर्भाचं 2 हंगामात प्रतिनिधित्व केलं. तसेच विदर्भाने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. करुणने विदर्भाला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर करुणला भारतीय कसोटी संघात 8 वर्षांनी पुनरागमनाची संधी देण्यात आली होती.
रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटक क्रिकेट टीम : मयंक अग्रवाल (कर्णधार), करुण नायर, आर स्मरण, केएल श्रीजीत (विकेटकीपर), श्रेयस गोपाल, विशक विजयकुमार, विद्वथ कावेरप्पा, अभिलाष शेट्टी, एम वेंकटेश, निकिन जोस, अभिनव मनोहर, कृतिक कृष्णा (विकेटकीपर), केवी अनीश, मोहसिन खान आणि शिखर शेट्टी.