IPL 2026 : सीएसकेनंतर आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार फिक्स, सलग तिसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा, कोण आहे तो? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 18, 2025

IPL 2026 : सीएसकेनंतर आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार फिक्स, सलग तिसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा, कोण आहे तो?

IPL 2026 : सीएसकेनंतर आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार फिक्स, सलग तिसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा, कोण आहे तो?

आयपीएल 19 व्या मोसमासाठी 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. पुन्हा एकदा अबुधाबीत ऑक्शन होणार आहे. त्याआधी 15 नोव्हेंबरला एकूण 10 फ्रँचायजींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली. रिटेन्शनमध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. केकेआरने 12 वर्षांपासून सोबत असलेल्या विस्फोटक ऑलराउंडर आंद्रे रसेल याला रिलीज केलं. राजस्थान रॉयल्सने सीएसकेच्या रवींद्र जडेजा याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या गोटात घेतलं. तर राजस्थानने कॅप्टन आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला चेन्नई सुपर किंग्सकडे पाठवलं.

संजू चेन्नईत आल्याने त्याला कर्णधारपदही मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र रिटेन्शननंतर काही तासांनीच सीएसकेने 19 व्या मोसमासाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. ऋतुराज गायकवाड हाच चेन्नईचं नेतृत्व करणार असल्याचं सीएसकेने जाहीर केलं. त्यानंतर आता आणखी एका फ्रँचायजीने आपल्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे.

पॅट कमिन्स कर्णधारपदी

एसआरएच अर्थात सनरायजर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी ऑलराउंडर पॅट कमिन्स याच्यावर पु्न्हा एकदा विश्वास दाखवला आहे. पॅटला कर्णधारपदी कायम ठेवलं आहे. फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. पॅटचं हैदराबादचं नेतृत्व करण्याचं यंदाचं सलग तिसरं वर्ष असणार आहे. पॅटने याआधी 2024 आणि 2025 नेतृत्व केलं आहे.

एडन मार्करम याच्या जागी नियुक्ती

पॅट हैदराबादचं 2024 पासून नेतृत्व करत आहे. पॅटला एडन मार्करम याच्या जागी कर्णधार करण्यात आलं होतं. पॅटसाठी  फ्रँचायजीने 2024 साली तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजले होते. पॅटला नेतृत्वाचा तगडा आणि दांडगा अनुभव आहे. पॅटने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला वनडे आणि टेस्ट वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.

पॅट कमिन्स याची आयपीएल कारकीर्द

पॅटने आयपीएलमध्ये हैदराबादआधी कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. पॅटने आयपीएलमधील 72 सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच पॅटने 3 अर्धशतकांसह 612 धावा केल्या आहेत.

पॅट कमिन्स हैदराबादला आयपीएल ट्रॉफी मिळवून देणार?

हैदराबाद आयपीएल चॅम्पियन

दरम्यान हैदराबाद आयपीएल चॅम्पियन टीम आहे. हैदराबादने 2016 साली अंतिम फेरीत आरसीबीवर मात करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. हैदराबादला गेल्या हंगामात लौकीकाल साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदा पॅट कमिन्स हैदराबादला  आपल्या नेतृत्वात पहिली आणि एकूण दुसरी आयपीएल ट्रॉफी मिळवून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.