90s Bollywood Song : रवीना टंडनने 10 वेळा ड्रेस बदलला, सुनील शेट्टी मात्र एकाच सूटमध्ये! 30 वर्षांनंतरही गाण्याची क्रेझ कायम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 12, 2026

90s Bollywood Song : रवीना टंडनने 10 वेळा ड्रेस बदलला, सुनील शेट्टी मात्र एकाच सूटमध्ये! 30 वर्षांनंतरही गाण्याची क्रेझ कायम

90s Bollywood Song : रवीना टंडनने 10 वेळा ड्रेस बदलला, सुनील शेट्टी मात्र एकाच सूटमध्ये! 30 वर्षांनंतरही गाण्याची क्रेझ कायम

बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकातील चित्रपटांचे आणि गाण्यांचे एक वेगळेच स्थान आहे. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत संस्मरणीय असा काळ होता. हा काळ त्याच्या सदाबहार गाण्यांसाठी आजही ओळखला जातो. आज आपण अशाच एका गाण्याबद्दल बोलणार आहोत, जे ९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर गाणं होतं आणि आजही तरुणांना त्यावर थिरकायला भाग पाडतं.

१९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रक्षक’ या चित्रपटातील हे गाणं आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात सुनील शेट्टी, रवीना टंडन, सोनाली बेंद्रे आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तब्बल ३० वर्षे उलटून गेली असली, तरी या गाण्याने प्रेक्षकांना लावलेलं वेड आजही कमी झालेलं नाही. त्या काळात रवीना आघाडीची अभिनेत्री होती आणि तिच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी सुपरहिट ठरली होती.

आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत त्याचे बोल आहेत ‘शहर की लडकी’. हे गाणं सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याला अभिजित आणि चंदना दीक्षित यांनी त्यांचा आवाज दिला आहे. या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि रंजक बाब म्हणजे, संपूर्ण गाण्यात जिथे रवीना टंडनने तब्बल १० वेळा आपले ड्रेसेस (कॉस्ट्यूम) बदलले, तिथे सुनील शेट्टीने मात्र एकाच पांढऱ्या सूटमध्ये संपूर्ण गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं. रवीना प्रत्येक फ्रेममध्ये नवीन आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली, तर सुनील एकाच वेशात.

सिनेमाची कथा

‘रक्षक’ या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं तर, ती एसीपी राज सिन्हा (सुनील शेट्टी) याच्या भोवती फिरते. तो त्याच्या बालपणीचा मित्र आणि आता बनावट नोटा छापून गुन्हेगार बनलेल्या मित्राला कसा पकडतो, यावर आधारित हा चित्रपट होता.

आज काळ बदलला असला तरीही हे गाणं आजही लोकांना तितकंच आकर्षित करतं. ९० च्या दशकातील या सदाबहार गाण्यावर आजही पार्टी आणि सोशल मीडियावर तरुण-तरुणी आवडीने रील्स बनवताना आणि थिरकताना दिसतात. यूट्यूबवर या गाण्याला ७९ मिलियन व्ह्यज मिळाले आहेत.