हृतिक रोशन पुन्हा सुपरहिरो... 'क्रिश ४' येणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

हृतिक रोशन पुन्हा सुपरहिरो... 'क्रिश ४' येणार

https://ift.tt/2LXWZPQ
पुणे: अभिनेता आणि त्यानं मोठ्या पडद्यावर साकारलेला सुपरहिरो हे समीकरण 'क्रिश' या चित्रपटानं दृढ केलं. सलग तीन भाग झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चर्चा होती. हृतिकच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे लवकरच हृतिक 'क्रिश ४' या चित्रपटाचं काम सुरू करतोय. हृतिकनं २००३ मध्ये 'कोई मिल गया' या चित्रपटात सुपरहिरो साकारला. त्याचे वडील राकेश रोशन यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर २००६ मध्ये 'क्रिश' आणि २०१३ मध्ये 'क्रिश ३' हे चित्रपट आले. चाहत्यांचा त्याला प्रतिसादही मिळाला. २०१७ मध्ये चित्रपटाच्या चौथ्या भागावर काम करायचा निर्णय हृतिकनं घेतला. मात्र, हे काम काही पुढे गेलं नाही. त्यानंतर हृतिकनं 'मोहेंजोदडो', 'काबील', 'सुपर ३०' आणि आता 'वॉर' हे चित्रपट केले. राकेश रोशन यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे हृतिक आता चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. नव्या चित्रपटाबद्दल हृतिक म्हणाला, 'मी लवकरच माझे बाबा आणि या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांसोबत चर्चा करून क्रिश ४ या चित्रपटाचं काम सुरू करतोय. बाबांच्या तब्येतीमुळे या चित्रपटाचं काम थोडं बाजूला ठेवलं होतं. आता मात्र या चित्रपटाचं काम आम्ही सुरू करतोय.' हृतिकनं २०१२ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'अग्नीपथ' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केलं. आता तो 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये दिसणार अशी चर्चा आहे. त्यावर मात्र, हृतिकनं काही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या जोडगोळीच्या 'वॉर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एंट्रीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'वॉर'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा ट्विटरवर शेअर केला आहे. वॉर सिनेमा एकाचवेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तिन्ही भाषांमधील सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन ५३.३५ कोटी इतकं आहे. त्यात एकट्या हिंदी व्हर्जनने ५१.६० कोटी इतकी कमाई केली आहे. तर तमिळ आणि तेलुगूमध्ये १.७५ कोटी इतकी कमाई झाली आहे. पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत वॉरने तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा राष्ट्रीय चित्रपट आणि हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि यशराज फिल्म्सचा पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.