
परळी (बीड): विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या ८३ उमेदवारांविरुद्ध बंडखोरी केली आहे. तर, शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या ६९ उमेदवारांना आव्हान दिलं आहे. त्यांची युती खऱ्या अर्थानं झालेलीच नाही. त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या महाआघाडीला चांगलं यश मिळेल,' असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व परळीचे उमेदवार यांनी आज व्यक्त केला. वाचा: धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत चुलत बहीण पंकजा मुंडे यांच्याशी होत असून संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडं लागलं आहे. आज मतदान करण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 'युती केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे भाजप व शिवसेनेला या दोन्ही पक्षांना वाटत होतं. त्यामुळं नाइलाजानं ते एकत्र आलेत. खऱ्या अर्थानं त्यांची युती झालेलीच नाही. प्रसारमाध्यमांनी ही बाब योग्यरित्या पुढं आणलेली नाही,' असं मुंडे म्हणाले. वाचा: परळीची काळजी नाही! परळीच्या निवडणुकीबद्दल त्यांनी भाष्य केलं. 'परळीची काळजी वाटत नाही. परळीच्या जनतेनं ठरवलंय,' असं ते म्हणाले. परळीतील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुंडे यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी पंकजा यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळं येथील निवडणुकीला वेगळं वळण लागलं आहे. या घटनाक्रमाबद्दल बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. 'या निवडणुकीत ज्या पद्धतीनं माझी बदनामी झाली. एवढा मोठा डाग घेऊन जगावं असं वाटतच नाही. बहीण-भावाच्या नात्याला कलंक लावणारी अशी निवडणूक कुणाच्या नशिबी येऊ नये,' असंही ते म्हणाले. वाचा: महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.