
कोल्हापूर: कर्नाटकच्या हुबळी रेल्वेस्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटाचे कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि बॉम्बशोध पथकाच्या तज्ज्ञांची टीम सोमवारी रात्री तातडीने हुबळीकडे रवाना झाली आहे. हुबळी रेल्वे स्टेशनवर सोमवारी अज्ञात वस्तूंच्या स्फोटात एकजण जखमी झाला आहे. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तमिळनाडूमधून कोल्हापूरला येत होते. ज्या रेल्वेतून पार्सल येत होते ती अमरावती एक्स्प्रेस हुबळीपर्यंतच होती. आरपीएफ जवानाला डब्यातील बॉक्स संशयास्पद वाटल्याने तो उतरून विक्रेत्याकरवी खोलण्याचा प्रयत्न केला असता त्याचा स्फोट झाला. या स्फोटाचे उजळाईवाडीत शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी काही कनेक्शन आहे काय, याची चौकशी कोल्हापूर पोलिस करणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथक सोमवारी रात्री हुबळीकडे रवाना झाले. या दोन्ही स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘हायअलर्ट’जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापुरात घातपात घडवण्यासाठी की अन्य काही कारणासाठी स्फोटके आणण्यात येत होती, या अनुषंगाने तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, बसस्थानके, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गासह शहरात नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. १८ ऑक्टोबरला उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा मृत्यू झाला होता. पुलाच्या शेजारील नाल्यात जिलेटिन, तांब्याची केबल, सुतळ्या, रासायनिक पावडर, पुंगळी आदी साहित्यही सापडले होते. या स्फोटाचे कर्नाटक कनेक्शन असल्याच्या संशयावरुन हैदराबाद आणि कर्नाटकच्या दहशतवादी पथकाने उजळाईवाडी परिसरात भेट देऊन माहिती देखील घेतली होती. कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवरील स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन असल्याची शक्यता कर्नाटक पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने विशेष पथक हुबळीला पाठवले आहे. डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक