
नवी दिल्ली: फ्रान्सकडून भारताला मिळालेल्या 'राफेल' या पहिल्या लढाऊ विमानाचं पूजन करण्यावरून देशात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेवर संरक्षणमंत्री यांनी अखेर मौन सोडलं आहे. 'ज्याला जे बोलायचं आहे, ते बोलण्यास तो मोकळा आहे. मला जे योग्य वाटलं ते केलं आणि भविष्यातही करणार,' असं राजनाथ यांनी म्हटलं आहे. भारतीय राजकारणात वादाचा विषय ठरलेली राफेल लढाऊ विमाने पुढच्या वर्षीपर्यंत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील पहिलं विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी भारताला मिळालं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राजनाथ यांनी या विमानातून उड्डाणही केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्याची परंपरा भारतात आहे. राफेल त्याच दिवशी मिळाल्यामुळं राजनाथ यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्या विमानाचं विधीवत पूजन केलं. विमानाच्या पंखावर 'ओम' काढला. तसंच, विमानाच्या चाकाखाली लिंबू फोडलं. 'राफेल' पूजनाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार विज्ञान, तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्येही अंधश्रद्धांचं स्तोम माजवत आहे, अशी टीका सुरू झाली. राजनाथ सिंह यांनी मीडियाशी बोलताना नुकतंच याचं उत्तर दिलं. 'माझी एक श्रद्धा आहे. या सृष्टीत कुठली ना कुठली एक सुपरपॉवर आहे. लहानपणापासून मी तसं मानत आलो आहे. त्या विश्वासातून मला जे योग्य वाटलं ते केलं. त्याबद्दल कोणाला काहीही वाटो,' असं ते म्हणाले. काँग्रेसमध्येही मतभेद असतील! देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनंही राफेल पूजनावर टीका केल्याकडं लक्ष वेधलं असता राजनाथ म्हणाले, 'या मुद्द्यावर काँग्रेसमध्येही मतभेद असतील. त्यांच्या पक्षातही सर्वसहमती नसेल. काहींना त्यात अजिबात चुकीचं काही दिसलं नसेल. मुळात पूजा करण्याबद्दल कोणाला काय आक्षेप असू शकतो,' असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. 'माझ्याऐवजी कुणी दुसऱ्या धर्माचा असता आणि त्यानं आपल्या पद्धतीनं पूजा केली असती तरी मला त्यात काही वावगं वाटलं नसतं,' असंही ते म्हणाले. 'खरंतर भारताला सुपरपॉवर बनविण्यासाठी आपल्याला 'राफेल'सारख्या शस्त्रांची गरज आहे. या विमानामुळं आपली मारक क्षमता वाढली आहे. ते मिळणं ही एक चांगली घटना होती. निरर्थक चर्चेऐवजी या घटनेचं स्वागत व्हायला हवं होतं,' असं ते म्हणाले.