
अहमदाबाद: घरगुती वाद मिटल्याचं भासवून पत्नीकडे मागितला आणि त्यानंतर तिची जीभ चाकूने कापून पती पसार झाल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली. तस्लीम असं पीडितेचं नाव आहे. या प्रकरणी तिनं पतीविरोधात वेजलपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, फरारी आरोपीचा शोध सुरू केला आहे. तस्लीम अहमदाबादमधील जुहापुरा परिसरात राहते. पती आयुब बेरोजगार आहे. यावरून त्यांच्यात रोज खटके उडत होते. बुधवारी आयुबने तिच्याकडे फ्रेंच किस मागितला. आयुब भांडण विसरला असून, ते मिटवण्याची त्याची तयारी आहे असा तिचा समज झाला. त्यामुळं ती फ्रेंच किस द्यायला तयार झाली. त्यानंतर जे घडलं, त्याचा तिला मोठा धक्का बसला. किस देत असताना आयुबनं तिची जीभ हातात पकडली आणि चाकूने कापली. त्यानंतर तो खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून पसार झाला. तस्लीमनं बहिणीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तसंच तिनं आरडाओरडा करत शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला एसव्हीपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिच्या जीभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आयुब बेरोजगार आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती वेजलपूरचे पोलीस निरीक्षक एलडी ओडेडारा यांनी दिली. आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. पती-पत्नीमध्ये रोज उडायचे खटके जुहापुराच्या महाराज फ्लॅट्समध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. पीडिता तस्लीम हिनं या प्रकरणी पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तस्लीमचं २००८ साली आयुबसोबत लग्न झालं आहे. हा तिचा तिसरा विवाह आहे आणि आयुबचा दुसरा विवाह आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दोन-तीन महिने चांगला संसार केला. मात्र, त्यानंतर आयुब क्षुल्लक कारणांवरून वाद घालू लागला, असं तस्लीमनं पोलिसांना सांगितलं. बेरोजगारीमुळं वाद तस्लीमनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'आयुब खूपच बेजबाबदार होता. बेरोजगार असलेल्या आयुबकडे कामाबद्दल विचारणा केली तर तो वाद घालत असे. इतकंच नाही तर मारहाणही करत होता.' संसार टिकून राहावा यासाठी सगळं निमुटपणे सहन करत होते, असं तस्लीमनं सांगितलं.