नाशिक: कपाशीची बोंडे सडली, कांद्यावर बुरशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

नाशिक: कपाशीची बोंडे सडली, कांद्यावर बुरशी

https://ift.tt/2MTz0So
येवला: यावर्षी अगदी दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसाचा तडाखा सुरूच असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्‍यात सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन ह्या खरीप हंगामातील पिकांसह लागवड केलेल्या लेट खरीप लाल पोळ कांद्यास मोठा फटका दिला आहे. याबरोबरच पुढील रब्बी हंगामाच्या दृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे देखील अतिपावसाने सडण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण आणि अतिपाऊस यामुळे उन्हाळ देखील होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या खरीप हंगामातील कपाशी काढण्याच्या अवस्थेत असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, सातत्याचे ढगाळ वातावरण आणि न मिळणारा सूर्यप्रकाश यातून कपाशी पिकास देखील मोठा झटका बसला आहे. पाऊस सुरूच राहिल्याने कपाशीच्या बोंडात पाणी घुसून कापूस सडू लागला आहे. कपाशीतील सरकीस देखील मोड फुटल्याचे दिसत आहे. मकाच्या बीटीत देखील पाणी घुसून मोड फुटल्याचे चित्र समोर आलं आहे. 'यंदा प्रारंभी १२ पायली उन्हाळ कांद्याचे रोप शेतात टाकले होते. ते महिनाभरापूर्वी झालेली पावसात मोठया प्रमाणात सडून गेले होते. त्यानंतर बाहेरून कांदा उळे (बियाणे) आणून काही दिवसांपूर्वी पुन्हा दुसऱ्या टप्प्यात उन्हाळची रोपे टाकली. मात्र परतीचा पाऊस दीर्घकाळ सुरूच राहिल्याने ही रोपे देखील सडण्याचा मार्गावर आहेत. त्यातून पुढील रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास उशीर होणार आहे. रोपे अधिक खराब झाल्याने उन्हाळ कांद्याची एकरी लागवड देखील कमी होणार आहे- विजय भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल