
मुंबई: 'कबीर सिंह' सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कियारा आडवाणीनं काही गुंडांना बदडून काढलंय. ही घटना घडली लखनऊमधल्या गोमती नगर भागातल्या एका शॉपिंग मॉलमध्ये. पण, ही मारामारी काही खरीखुरी नव्हती बरं का. 'इंदू की जवानी' या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाचा हा एक भाग होता. लखनऊमधल्या शॉपिंग मॉलमध्ये चित्रीत केलेल्या या दृश्यांचं चित्रण करण्यासाठी दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यानं काही छुप्या कॅमेऱ्यांचा वापर केला. कियारा मॉलमध्ये चालत येते आणि तिला काही गुंड घेरतात... हे गुंड तिची छेड काढतात. त्यानंतर मात्र कियारा शांत न बसता एकेकाला पकडून त्यांच्याशी दोन हात करते असं दृश्य चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. कियाराच्या चित्रपटातील या दृश्याचं चित्रीकरण छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करून सुरू असल्याने मॉलमध्ये असलेल्या लोकांना मात्र हे सगळं खरोखरच घडतंय की काय असं वाटलं. सोशल मीडियावर कियाराच्या या ढिशूमढिशूमची चर्चा होती. सध्या कियाराच्या या मारामारीची चर्चा रंगली असली तरी काही दिवसांपूर्वी चर्चा होती ती तिच्या अफेअरची! कलाकारांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा इंडस्ट्रीत नेहमी होत असतात. पण काही दिवसांपूर्वी चर्चेतली नंबर वन जोडी होती आणि यांची. कियाराच्या वाढदिवशी सिद्धार्थ पूर्ण दिवस तिच्याबरोबर होता. त्यामुळे ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत असं बोललं जातंय. सिद्धार्थला एका शोमध्ये विचारण्यात आलं होतं, की 'तुला कुणासोबत हुक-अप करायला आवडेल?' त्यावर त्यानं चटकन कियारा, जॅकलिन आणि तारा सुतारिया यांची नावं घेतली होती. पण, आता तो सतत दिसतोय ते कियारासोबतच. करण जोहरच्या गेट-टूगेदर पार्टीमध्ये या दोघांच सूत जुळलं असल्याची चर्चा आहे. तसेच अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. आलिया भट्टसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थचं नाव अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतही जोडलं गेलं होतं. खरं तर जॅकलिनमुळंच सिद्धार्थ आणि आलियाचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातंय. मात्र अद्याप कियारा किंवा सिद्धार्थपैकी कोणीही त्यांच्या नात्याबाबत जाहीरपणे खुलासा केलेला नाही.