
ओटावा (कॅनडा)- कॅनडात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९ लोकसभेच्या जागेवर मूळच्या पंजाबी असलेल्या व्यक्तीने विजय मिळवला आहे. कॅनडाच्या ३.५ टक्के असलेल्या लोकसंख्येत मूळच्या पंजाबी लोकांनी ब्रँप्टनमध्ये क्लीन स्वीप करीत सर्वच्या सर्व जागेवर विजय मिळवला आहे. सर्वात जास्त लिबरल पार्टीचे उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत लिबरल पार्टीने २०, कंजर्व्हेटिव पार्टीने १६, एनडीपीने १२ आणि पीपुल्स पार्टीने भारतीय मूळच्या पाच उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यात ५० पंजाबी व्यक्तींचा समावेश होता. वैंकुवरमधून मूळचे पंजाबी संरक्षणमंत्री हरजीत सिंह सज्जन, सरींहमधून रणदीप सिंह सराय, सरींहच्या न्यूटनमधून सुख धालीवाल, माल्टन मिसीसागामधून मंत्री नवदीप बैंस, मिसीसागामधून गगन सिकंद, ब्रैंप्टन मध्यमधून रमेश संघा, ब्रँप्टन पूर्वमधून मनिंदर सिद्धू, ब्रँप्टन पश्चिममधून कमल खैहरा, ब्रँप्टनमधून रूबी सहोता, ब्रँप्टन दक्षिणमधून सोनिया सिद्धू, वाटरलूमधून बरदीश चग्गर, किचनरमधून राज सैनी, ओकविलामधून अनिता आनंद आणि क्यूबिकमधून अंजू ढिल्लो यांनी लिबरलच्या तिकिटावर निवडणूक लढवली व विजय मिळवला आहे. नेपियन मधून चंद्र आर्य यांचा ही या निवडणुकीत विजय झाला आहे. ते मूळचे कर्नाटक या राज्यातील रहिवासी आहेत. हे सर्व जण लिबरल पार्टीचे नेते आहेत. एनडीपी पार्टीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार जगमीत सिंह यांनी बरनबी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. जगमीत सिंह यांचा पक्ष ट्रूडो सोबत युती करून कॅनडात सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर कंजरवेटिव्ह पार्टीच्या तिकिटावर माजी मंत्री टिम उप्पल यांनी मिलफूड एडमिंटन, कॅलगरीमधून जसराज सिंह, कॅलगरीच्या स्काईव्ह्यू मधून जैग सहातो व मराखममधून बोब सरोया यांनी विजय मिळवला आहे. मलसिया, जालंधरचे रहिवासी असलेले २६ वर्षीय मनिंदर सिद्धू यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली व ते या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या विजयासोबतच ते कॅनाडामधील सर्वात तरुण खासदार बनले आहेत. तर मूळचे पंजाबी सुख धालीवाल चौथ्यांदा निवडून आले आहेत. जालंधरचे रमेश संघा लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.