तीन दिवसांच्या सुट्टीत 'तो' झाला 'करोडपती' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2019

तीन दिवसांच्या सुट्टीत 'तो' झाला 'करोडपती'

https://ift.tt/2Mm1JyX
मुंबई टाइम्स टीम नोकरीतून त्याला जेमतेम तीन दिवस सुट्टी मिळाली. त्या सुट्टीत तो मुंबईमध्ये आला आणि चक्क करोडपती झाला. बिहारहून मुंबईत आलेला रेल्वे कर्मचारी गौतम कुमार झाची ही गोष्ट. लाखो प्रेक्षकांचा लाडका शो असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये गौतम कुमारचं नशीब पालटलं. इथवर पोहोचण्याचं श्रेय तो त्याच्या बायकोला देतो. केबीसीच्या नव्या सीझनमध्ये एक कोटी रुपये जिंकणारा तो दुसरा स्पर्धक ठरला आहे. गौतम कुमार मूळचा बिहारचा. करोडपती झाल्यानंतर कुटुंबीय, कार्यालयातील सहकाऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या अनुभवाबद्दल ‘मुंटा’शी गप्पा मारताना तो म्हणाला, की ‘केबीसीमध्ये येऊन मला खूप छान वाटलं. अमिताभ बच्चन यांना भेटायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या वागण्यातला साधेपणा आश्चर्यचकीत करणारा होता. ब्रेकमध्ये ते स्पर्धकांना प्रोत्साहन देत असतात. जो कोणी इथे खेळायला येतो तो चांगली रक्कम जिंकेल असा त्यांचा प्रयत्न असतो.’ नोकरीतून जेमतेम तीन दिवसांची सुट्टी घेऊन गौतम कुमार मुंबईला आला होता. त्याच्या कार्यालयात सर्वांना माहीत होतं की तो केबीसीमध्ये जाणार आहे. केवळ तीन दिवसांच्या सुट्टीनंतर तो पुन्हा ऑफिसात रुजू झाला. ‘जास्त सुट्टी न मिळाल्यानं मुंबईत फिरता आलं नाही. पण, खरोखरच हे स्वप्नांचं शहर आहे. मी नक्कीच पुन्हा इथे फिरायला येईन. भारतीय रेल्वेच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी फोन केले. या सगळ्या प्रवासात बायकोनं मला खूप पाठिंबा दिला. याआधी अनेकदा प्रयत्न करून माझी शोमध्ये निवड झाली नव्हती. एका क्षणी मी ठरवलं होतं, की आता बास झालं. पण, पत्नीनं मला प्रोत्साहन दिलं. तिच्यामुळे आज मी इथवर पोहोचलो. बक्षिसाच्या रकमेतून मी पाटणामध्ये घर घेणार आहे. उर्वरित रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी ठेवणार आहे’, असं गौतम कुमारनं सांगितलं.