मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथे भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले असून बैठकीतली निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे सर्व आमदार उपस्थित आहेत. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला फडणवीस यांचं आगमन होताच आमदार आणि कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देऊन त्यांचं स्वागत केलं. 'देवेंद्र फडणवीस जिंदाबाद', 'देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत करतानाच आमदारांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाजप आमदारांची बैठक होत असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.