हा तर काँग्रेसला गाडणारा निर्णय: संजय निरुपम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 21, 2019

हा तर काँग्रेसला गाडणारा निर्णय: संजय निरुपम

https://ift.tt/337IRZV
मुंबई: शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं नवं सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झालं असलं तरी काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. 'शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणं म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखं आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीवर तोफ डागली आहे. 'काही वर्षांपूर्वी काँग्रेसनं बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून चूक केली होती. तेव्हा असा धुव्वा उडाला होता की अजून काँग्रेस त्यातून सावरली नाही. महाराष्ट्रात आम्ही पुन्हा तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणं म्हणजे स्वत:ला जमिनीत गाडून घेण्यासारखं आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कुठल्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये. त्यातच पक्षाचं भलं आहे,' असं निरुपम यांनी म्हटलं आहे. एकेकाळी शिवसेनेत असलेले संजय निरुपम काँग्रेसकडून खासदार राहिले आहेत. काँग्रेसनं त्यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही दिली होती. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीतून त्यांना पायउतार व्हावे लागले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समर्थकांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी प्रचारावर बहिष्कार घातला होता. काँग्रेसला मुंबईत एखादी जागा मिळेल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं. आता काँग्रेस सत्तेच्या जवळ जात असताना त्यांनी विरोधाचा सूर लावला आहे.