नव्या आघाडीतही अडीच वर्षांचं सूत्र; उद्धव-अहमद पटेल चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 13, 2019

नव्या आघाडीतही अडीच वर्षांचं सूत्र; उद्धव-अहमद पटेल चर्चा

https://ift.tt/2KhhhD0
मुंबई: महाराष्ट्रात आकाराला येऊ घातलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार, महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेसला सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जु खर्गे व वेणूगोपाल यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. सेनेशी आघाडी करताना नेमकं कसं पुढं जायचं, यावर त्यांच्यात खल झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यांच्यात संभाव्य आघाडीतील सत्तावाटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. त्यानुसार, तिन्ही पक्षांच्या या आघाडीत प्रत्येकाला तोलामोलाची पदं मिळणार असल्याचं समजतं. काँग्रेस नेते आज लीलावतीत उद्धव व अहमद पटेल यांच्या भेटीनंतर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व माणिकराव ठाकरे हे लीलावती रुग्णालयात शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. असे आहे पक्षीय बलाबल राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.