
मुंबई राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असतानाही सत्ता स्थानपनेची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने आता भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यात ट्विटरवर सोमवारपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर ट्विटरकर करताना दिसत आहेत. ट्विटरवर #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग्ज प्रचंड ट्रेण्ड होत आहेत. या हॅशटॅग्जच्या माध्यमातून ट्विटरकर फडणवीसांविरुद्धची नाराजी व्यक्त करत आहेत. शेतकरी आत्महत्या, आरेमधील वृक्षतोड, बेरोजगारी, कोल्हापूर-सांगलीतील पूर अशा विविध मुद्द्यांवरून फडणवीसांच्या कामगिरीवर नाखूश असल्याचं ट्विटरकर व्यक्त होत आहेत. राज्यासमोर उभे ठाकलेले सर्व प्रश्न आणि समस्यांना फडणवीस जबाबदार असल्याचं ट्विटरकरांचं म्हणणं आहे. इतकचं नव्हे, तर शिवसेनेने भाजपसोबतची युती संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावं असाही सल्ला ट्विटरकर मोठ्या प्रमाणावर देत आहेत. फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन'च्या नाऱ्याचाही ट्विटरकर चांगला समाचार घेत आहेत. फडणवीसांची ही घोषणा ट्विटरकर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतेय. एका ट्विटरकराने तर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता संबोधल्याबद्दलही नाराजी व्यक्त करत फडणवीसांना नाकारलं आहे.