
मुंबई: दिल्लीतील 'फडणवीस-शहा भेट' आणि 'शरद पवार-सोनिया गांधी' भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार यांनी पुन्हा एकदा असे सूचक वक्तव्य केले आहे. 'ही सत्याची लढाई असून, विजय आमचाच होईल. राज्याचा निर्णय राज्यातच होणार', असे सांगताना, 'राज्याचा चेहरा आता बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार', अशा शब्दात राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्यात काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार का यावरही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या नव्या समीकरणावर बोलण्याचे टाळत, राऊत यांनी मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार असे म्हटले आहे. वाचा- 'अपक्षांची भूमिका महत्त्वाची' यावेळी बोलताना राऊत यांनी अपक्ष आमदारांचा आवर्जून उल्लेख केला. नव्या सरकारच्या स्थापनेमध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेच्या समर्थकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचेही ते म्हणाले. आपल्याकडे कशाची फाईल आहे, आमदारांची नावे त्यात आहेत का, असा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले की, आमच्याकडे सगळे काही आहे, आणि आमच्याकडे काय काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे, असे उत्तर राऊत यांनी दिले. 'शरद पवार मोठे नेते, त्यांना राज्यात आणू नका' शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशाचे फार मोठे नेते आहे. त्यांना राज्यात बोलावू नका. शरद पवार मुख्यमंत्री होणार ही अफवा असून अशा अफवा बंद करून टाका असेही राऊत पुढे म्हणाले. वाचा- 'तरुण भारत'च्या टीकेलाही दिले उत्तर तरुण भारत या दैनिकाने अग्रलेखातून आज पुन्हा संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, 'टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हीही टीका करत असतो. बोलण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र विनाशकाले विपरित बुद्धी कोणाची आहे याचे उत्तर उद्धव ठाकरे देतील. शिवेसना पक्षप्रमुखांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न होतो आहे. दिलेला शब्द पाळलेला नाही, यावर कुणी का बोलत नाही. सगळ्यांना सत्तेची हाव आहे, कुणालाही खुर्च्या सोडायची नाही. कोण खोटे बोलते याची कल्पना राज्याला आहे.'