
नवी दिल्ली: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत संधान साधत भारतीय जनता पक्षाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले. हे सरकार महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे या शुभेच्छा दिल्या आणि ही पोस्ट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनाही टॅग केली आहे. आज पहाटे या नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जणू भूकंप झाला आहे. सरकारस्थापनेनंतर मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. 'महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणासाठी हे सरकार निरंतर कटिबद्ध असेल आणि राज्याच्या प्रगतीसाठी नवे मापदंड स्थापित करेल,' अशा शब्दात अमित शहा यांनी नव्या सरकारप्रति विश्वास व्यक्त केला आहे.