मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊत यांच्या नावाची चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊत यांच्या नावाची चर्चा

https://ift.tt/2s2mOqw
मुंबई: शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार हे निश्चित झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नवी आघआडी स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सध्या सर्वात आघाडीवर आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई व एकनाथ शिंदे यांची नावंही चर्चेत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्वाधिक पसंती राऊत यांनाच असल्याचं सूत्रांकडून समजतं.

भाजपला दूर ठेवून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीनं घेतला आहे. पूर्णपणे वेगळ्या विचारधारेच्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेणं हे शिवसेनेसाठी अत्यंत कठीण होतं. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांशी असलेल्या राऊत यांच्या संबंधांमुळं ते शक्य झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. संजय राऊत हे कडवट शिवसैनिक असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी आहेत. सत्तेत असताना व नसतानाही 'सामना'च्या माध्यमातून शिवसेनेला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केल्यानं शिवसेनेची ध्येयधोरणं व भूमिकांची स्पष्टता राऊत यांना आहे. नव्या सरकारचं संभाव्य सत्ताकेंद्र ठरू शकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांचं चांगलं सख्य आहे. शिवाय, अनेक वर्षे दिल्लीच्या वर्तुळात वावर असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशी त्यांचा उत्तम संपर्क असल्याचं बोललं जातं. आघाडीच्या सरकारमध्ये मित्रपक्षाला समजून घेणं, सरकारचे निर्णय त्यांना पटवून देणं याला अत्यंत महत्त्व असते. संजय राऊत ही परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकतात, असंही बोललं जातं. आमदारांचा निर्णय महत्त्वाचा संजय राऊत यांच्याशिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई व सध्याचे बिनीचे शिलेदार एकनाथ शिंदे यांचीही नावं चर्चेत आहेत. शिवसेनेच्या आमदारांची बैठक आज 'मातोश्री'वर होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यास राजी नसल्यास अन्य नावे आमदारांपुढं ठेवली जातील व त्यांची मते आजमावली जातील. त्यानंतर उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील. त्यामुळं मुख्यमंत्री कोण या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.