व्हायरल व्हिजिटिंग कार्डवाल्या गीतामावशींची गोष्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2019

व्हायरल व्हिजिटिंग कार्डवाल्या गीतामावशींची गोष्ट

https://ift.tt/32uymzC
पुणे: कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय निवडलेल्या गीतामावशी काळे रातोरात फेमस झाल्या.. त्यांना कामासाठी एवढे फोन येत आहेत की गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन बंद ठेवलाय.. बावधनमध्ये काम हवयं म्हणून केलेली ही उठाठेव... आज त्यांना मुंबई, पुणे नव्हे तर दिल्ली, हरियाणासह विविध राज्यांमधूनही फोन आले आहेत. यांच्या व्हिजिटिंग कार्डच्या सूत्रधार आहेत धनश्री शिंदे... त्याचं झाल असं की, बावधनमध्ये राहणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे गीतामावशी रोज घरकाम करायला येतात. काही दिवसांपूर्वी त्या काम करताना त्या चिंतेत होत्या. धनश्री यांनी त्यांना कारण विचारलं तेव्हा एक मोठं काम गेलं, आता पैशांचा खड्डा पडणार म्हणून काळजी वाटते आहे, असं त्या म्हणाल्या आणि सुरू झाला व्हिजिटिंग कार्डाचा प्रवास... हा गंमतीशीर प्रवास धनश्री शिंदे यांनी खास 'मटा'सोबत शेअर केला आहे... धनश्री शिंदे सांगतात,' मी गीताताईंना विचारलं की तुमचं व्हिजिटिंग कार्ड काढू आणि आपल्या आणि आजूबाजूच्या सोसायटीत वॉचमनला देऊ. ज्यांना घरकामासाठी मावशी पाहिजे असेल त्यांना हे कार्ड वॉचमन देतील. आम्ही ऑनलाइनच कार्ड तयार करायला घेतलं. त्यांना शेजारी बसवून मी भांडी घासण्याचे, धुणी धुण्याचे दर विचारले आणि कार्डावर लिहिले. कार्डावर आधारकार्ड नंबर टाकला तर त्याची विश्वासाहर्ता वाढते, म्हणून मी तोही नंबर टाकला. आमच्या दोघींनाही याची गंमतही वाटत होती आणि कुतूहलही होतं. ऑनलाइन प्रिटिंगची ऑर्डर केली. दोन दिवसात कार्डाचा गठ्ठा घरी आल्यावर आम्ही दोघीही खूष झालो. हे व्हिजिटिंग कार्ड रातोरात जगभरात पोहोचेल याचा आम्ही दोघींनीही विचार केला नव्हता. मी त्यातली चार पाच कार्ड काढून घेतली आणि उरलेला गठ्ठा घेऊन त्या घरी गेल्या. मला माझीच कल्पना खूप आवडली म्हणून मी एका मित्राला व्हॉट्सअॅपवर हे कार्ड शेअर केलं. बस्स एवढंच. दुसऱ्या दिवशी गीता मावशी कामाला आल्या तेव्हा, त्या एका फोनवर बोलत होत्या. मुंबईवरून त्यांना एका बाईंचा फोन आला होता. त्यांच्याशी बोलत होत्या. हा फोन म्हणजे सुरुवात होती. त्या दिवशी दुपारी मीच काढलेला फोटो मला अचानक फेसबुक, ट्विटरवर दिसालया लागला. काहींनी मला व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला आणि मला धक्का बसला. मी गीता मावशींना फोन केला, तर त्यांचा फोन बंद. शेवटी त्यांच्या पतीला फोन केला, तेव्हा ते म्हणाले, 'अहो ताई खूप फोन येत आहेत, काहीच सुचत नाही का करावे, म्हणून आम्ही फोन बंद केलाय.' 'तुम्ही कोणाला कार्ड दिले का?' असा प्रश्न विचारल्यावर त्यावर त्यांचे उत्तर होते की, 'नाही... कार्ड अजून घरातच आहेत.' न राहून मी ज्या मित्राला पहिल्यांदा कार्ड पाठवले त्याला फोन केला आणि सगळी गंमत कळली. त्या मित्रालादेखील ही कल्पना आवडली म्हणून त्याने कार्ड काही ग्रुपवर शेअर केले आणि काही तासात ते व्हायरल झाले. आता त्यांना जगभरातून मेसेज आणि फोन येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन माझ्याकडेच ठेवला आहे. मीच उत्तरं देत आहेत.' मी त्यांना काल विचारलं, 'अहो पण तुम्हाला बावधनमधून फोन आला का?' त्यावर त्या म्हणाल्या , 'हो मला बावधनमध्ये आता काम मिळालय, त्यामुळे सध्या तरी माझी गरज भागली आहे.' एखादा मेसेज व्हायरल झाला की काय होते याचा अनुभव गीताताई घेत आहेत.