
नवी दिल्ली: बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारीच त्यांची प्रकृती बिघडली होती. उपोषणाला बसल्यामुळे त्यांचे वजन ८ किलोने कमी झाले आहे. त्यांना कमालीची अशक्तपणा आला असून आता त्या चालणेही शक्य होत नाहीए. बलात्कार प्रकरणातील दोषींना ६ महिन्यांच्या आत फासावर लटकावले पाहिजे, अशी मालीवाल यांची मागणी आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या वैद्यकीय तपासणीत मालीवाल यांचा रक्तदाब ९२/७०, शुगर ६७, वजन ५७ किलो आणि पल्स ९० नोंदवले गेले होते. तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मालीवाल उपोषणाला बसल्या. त्यांनी गेल्या वर्षी देखील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून उपोषण केले होते. बलात्कार प्रकरणातील दोषींना सहा महिन्यांच्या आत फाशीवर लटकवावे, अशी मागणी त्यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली होती. निर्भयाच्या आईनेही उपोषण संपण्याचे केले आवाहन स्वाती यांची बिघडलेली तब्येत पाहून निर्भयाच्या आईनेही त्यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले होते. उपोषणामुळे मालीवाल यांच्या मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होऊ शकतो असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, मालीवाल आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी 'दिशा विधेयक' लागू करण्याची मागणी करत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. महिलांना न्याय देण्यासाठी दिशा कायदा लागू होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचेही मालीवाल यांनी म्हटले होते.