गरम गरम खायला कुणाला आवडत नाही? पावसाळा असेल तर अधिकच रंगत येते. पण गरम गरम भजी तयार होताना तुम्ही काळजीपूर्वक कधी बघितले आहे का? हरबऱ्याच्या डाळीच्या पीठात चवीप्रमाणे तिखट, मीठ आवडीनुसार कांदा, बटाटा इत्यादी पदार्थ टाकून एकसंध होण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी टाकतात. हे मिश्रण किती दाटसर आहे, पाण्याचे प्रमाण किती आहे यावरदेखील भज्यांची लज्जत अवलंबून असते. काही ठिकाणी या मिश्रणात खाण्याचा सोडा टाकून भजी अधिक हलकी केली जातात. या मिश्रणाचे छोटेछोटे गोळे करून कढईत असलेल्या गरम तेलात ते टाकले जातात. बनत असताना ही भजी झाऱ्याने हे सतत गरम तेलात हलवतात. भजी तयार करण्यासाठी वापरलेल्या घटकांचा दर्जा, तेलाचा प्रकार, तेलाचे तापमान, तेल गरम करण्याचा दर, तळण्यासाठी लागलेला वेळ अशा अनेक बाबींवर भजींचा दर्जा व लज्जत अवलंबून असते. मिश्रणाचे छोटेछोटे गोळे कढईत टाकले की सुरुवातीला ते तेलात बुडतात व कढईच्या तळाशी जातात. परंतु थोड्याच वेळात हे गोळे गरम तेलात तरंगू लागतात. असे नेमके कशामुळे होत असेल? सुरुवातीला तेलात बुडालेले गोळे काहीही न करता आपोआप तेलात का तरंगायला लागतात? आपल्याला शाळेत शिकवलेले असते की ज्याची घनता द्रवापेक्षा कमी तो द्रवात तरंगतो, ज्याची घनता द्रवापेक्षा जास्त असते तो पदार्थ द्रवात बुडतो. मग भज्यांच्या बाबतीत घनता आपोआप बदलते का? मिश्रणाच्या गोळ्याची गरम तेलात टाकतानाची घनता व त्यानंतर थोड्यावेळाने असलेली घनता वेगळी असते का? घनता म्हणजे वस्तूमान व आकारमान यांचे गुणोत्तर. जेव्हा मिश्रणाचा गोळा गरम तेलात टाकतो, त्यावेळी त्याला काहीतरी वस्तूमान असते तसेच काही तरी आकारमान असते. गरम तेलात टाकल्यानंतर मिश्रणाचा गोळा थोडा प्रसरण पावतो म्हणजेच त्याचे आकारमान वाढते तसेच उष्णतेमुळे मिश्रणात असलेल्या पाण्याचे काही प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे मिश्रणाच्या गोळ्याचे वस्तूमान कमी होते. थोडक्यात सांगायचे तर आकार वाढतो व वजन (वस्तूमान व यांचा गुणाकार) कमी होते. या सर्वाचा परिणामस्वरूप मिश्रणाच्या गोळ्याची घनता कमी होते व तो गरम तेलात तरंगू लागतो. घटकांच्या मिश्रणाचे गोळे ते भजी या स्थित्यंतरात गोळ्याच्या घनतेत बदल होतो. यापुढे भजींवर ताव मारताना ही बाजूपण समजून घ्या. डॉ. जयंत जोशी,मराठी विज्ञान परिषदoffice@mavipamumbai.org
https://ift.tt/2LTUfCK