
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरवाढीची शक्यता धुडकावल्यानंतर आज सकाळी भांडवली बाजारात तेजी दिसून आली. पाहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने द्विशतकी सलामी दिली. सध्या तो २५९ अंकांच्या वाढीसह ४११९३ अंकांच्या नव्या सार्वकालीन उच्चांकावर आहे.सोमवारी सेन्सेक्सने ४१ हजार १८५ अंकांच्या सार्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता. ६९ अंकांच्या वाढीस १२ हजार १२२ अंकावर आहे. रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही नजीकच्या काळात व्याजदर कपातीचे संकेत दिले होते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआय गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करेल,असे त्यांनी इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थितांना आश्वस्त केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या परिषदेला संबोधित करताना जीएसटी दरवाढीच्या शक्यता फेटाळून लावल्या. त्या म्हणाल्या की आता वस्तू महाग होणार नाहीत. जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. वस्तूंचा खप वाढण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढवा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सीतारामन यांनी सांगितलं. या सर्व घडामोडी शेअर बाजारातील तेजी वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले. आजच्या सत्रात ऑटो, टेलिकॉम, मेटल, आयटी, एनर्जी या क्षेत्रात खरेदी सुरु आहे. रिलायन्स इन्फ्रा, शिपिंग कॉर्प, दिवाण हौसिंग, एमएमटीसी, जे. के पेपर, उज्जीवन स्मॉल फायनान्स आदी शेअर तेजीत आहेत. तर मॅग्मा फिनकॉर्प, वेदांता, स्टार सिमेंट, आयआरबी इन्फ्रा, वोडाफोन आयडिया, श्री सिमेंट या शेअरमध्ये घसरण झाली. महागाईचे वातावरण व औद्योगित उत्पादनात नोंदवलेली घट यामुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला व त्यांनी समभागविक्रीचा पवित्रा स्वीकारला. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७० अंकांनी घसरून ४०९३८वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ३२ अंकांच्या घसरणीसह १२०५३चा स्तर गाठला.