
मुंबई: भाजपला दूर ठेवून सत्तेवर आलेल्या शिवसेनेनं भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. बहुमत चाचणीच्या वेळी भाजपच्या सदस्यांनी केलेला सभात्याग आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून घेतलेल्या माघारीवरून शिवसेनेनं फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. '१७०चा आकडा भाजपवाल्यांच्या डोळ्यांत व डोक्यांत घुसल्याचा हा परिणाम असून त्यांना आता माघारीची सवय करून घ्यावी लागेल,' अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'तून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपचे कर्मफळ आहे. महाराष्ट्रावर जोरजबरदस्तीचे अघोरी प्रयोग चालले नाहीत. दिल्लीच्या जारण-मारण मंत्राचा प्रभाव पडला नाही. 'बोलबच्चनगिरी' सत्तेवर असताना लोकांनी खपवून घेतली. आता 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' असं भाजपने पोसलेले मीडियावालेच बजावत आहेत. तरीही दिल्लीवाले 'फडणवीस एके फडणवीस' का करताहेत याचं रहस्य समजून घ्यावं लागेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> सरकारच्या बाजूनं १७० आमदारांचं बळ आहे हे शिवसेना पहिल्या दिवसापासून सांगत होती. पण यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून हा आकडा १३०च्या वर जायला तयार नव्हता. विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री 'टेकडा'सारखा दिसते, तसाच हा प्रकार आहे. >> पंतप्रधान मोदींच्या विरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले हे पहिले खासदार होते. मोदी कुणाला बोलू देत नाहीत असा त्यांचा आरोप होता. आता ते केवळ निवडूनच आले नाहीत तर विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. भाजपला ही सगळ्यात मोठी चपराक आहे. >> विरोधी पक्षनेत्यानं स्वत:ची व पदाची प्रतिष्ठा राखली तर सर्व ठीक होईल. आम्ही संसदीय लोकशाहीचा आदर करतो. तुम्हीही करा. कायद्यानं काम करा किंवा खडसे मास्तरांची पक्षांतर्गत शिकवणी लावा.