
मुंबई- अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक () यांचं काल १४ डिसेंबर रोजी मुंबईत निधन झालं. गीता काक यांनी बॉलिवूडमध्ये 'शोले', 'त्रिशूल', 'राम तेरी गंगा मैली' आणि 'नूरी' सारख्या सिनेमात काम केलं होतं. गीता सिद्धार्थ काक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात गुलझार दिग्दर्शित परिचय सिनेमातून केली. या सिनेमात त्यांच्यासोबत जितेंद्र आणि जया भादूरीही होते. याशिवाय १९७३ मध्ये आलेल्या 'गरम हवा' या सिनेमातील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक करण्यात आलं. ७० आणि ८० च्या दशकात गीता यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. यात 'गमन' (१९७८), 'सदगति' (१९८१), 'शौकीन' (१९८२), 'देश प्रेमी' (१९८२), 'अर्थ' (१९८२), 'मंडी' (१९८३) आणि 'निशान' (१९८३) सिनेमे केले. गीता यांनी टीव्ही होस्ट आणि निर्माता सिद्धार्थ काक यांच्याशी लग्न केलं. सिद्धार्थ काक हे नाव आजही 'सुरभि' या शोसाठी ओळखलं जातं. रेणुका शहाणे या शोचं सूत्रसंचालन करायच्या. १९९० ते २००१ पर्यंत दूरदर्शनवर हा शो प्रसारित व्हायचा. गीता या शोच्या आर्ट डिरेक्टरही होत्या. सिनेमांव्यतिरिक्त गीता या सामाजिक कार्यातही सक्रिय होत्या. गीता आणि सिद्धआर्थ यांना अंतरा काक ही एक मुलगी आहे.