
मुंबई- आपल्या अफलातून अभिनयाने अगदी थोड्याच काळात प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या विक्की कौशलचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. विकीच्या अॅक्टिंग स्कूलमधला हा व्हिडिओ असून रेअर फोटो क्लब या अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. यात विक्कीला पटकन ओळखणं तसं कठीण आहे पण एकदा का त्याची ओळख पटली की त्याच्यावरून नजर हटत नाही. या अॅक्टमध्ये तो हैदराबादी लहेजात बोलताना दिसत आहे. त्याने स्वतःचं तोंड रंगवलं असून केसांना भरपूर तेलही लावलं आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचप्रमाणे हा व्हिडिओ पाहून विक्की हरहुन्नरी अभिनेता होणारच होता हे कळतं. अगदी कमी वेळात विक्कीने त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं. अमिताभ बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत अनेकजण त्याच्या अभिनयाचे चाहते आहेत. विक्की प्रसिद्ध स्टंटमॅन आणि अॅक्शन दिग्दर्शक शाम कौशल यांचा मुलगा. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. यासाठी त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षणही घेतलं. पण शिक्षण घेत असताना आपला मुळ रस अभिनयात असल्याचं त्याला कळलं आणि त्यानंतर त्याने वडिलांसोबत सिनेमाच्या सेटवर जाणं सुरू केलं. यासोबतच त्याने किशोर नमित कपूर यांच्या अभिनय अकादमीमध्ये प्रवेश घेतला. विक्की कौशल्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो 'भूत: पार्ट वन' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर तो मेघना गुलझार दिग्दर्शित सिनेमात दिसेल. यात तो फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एवढंच नाही तर करण जोहरच्या तख्तमध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेष म्हणजे हे सर्व सिनेमे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे विक्कीच्या चाहत्यांसाठी पुढचं वर्ष एक पर्वणीच असेल यात काही शंका नाही.